कोल्हापूर/प्रतिनिधी
येथील केआयटी कॉलेजच्या वतीने रविवार ता. ८ जून २०२५ रोजी ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया-२०२५’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम कोल्हापूर येथील आनंद भवन, सायबर कॉलेज येथे ८ जून रोजी दुपारी ४ वा. संपन्न होणार आहे, अशी माहिती केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी व सचिव दिपक चौगुले यांनी दिली.
कोल्हापूरात आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये सुरवातीलाच केआयटी चे बदलते स्वरूप, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले विविध प्रयत्न, नवीन शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अभ्यासक्रमांमध्ये सुरू असलेले अमुलाग्र बदल याबाबतीत संस्थेचे संचालक मोहन वनरोट्टी यांनी उपस्थितांना माहिती दिली.
अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया ही थोडी गुंतागुंतीची आहे. प्रवेश प्रक्रियेत असणाऱ्या एकूण टप्प्यांवरती एखादी झालेली छोटी चूक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान ठरू शकते. याचे गांभीर्य ओळखूनच केआयटी विद्यार्थी व पालकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिवर्ष करीत असते. या कार्यक्रमात अभियांत्रिकीच्या विविध विभागातील करिअरच्या संधी, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील टप्पे, महत्त्वाची कागदपत्रे, शिष्यवृत्ती, आरक्षण, शासकीय नियम, विद्यार्थिनीसाठीच्या शासकीय सवलती याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे अधिष्ठाता अॅडमिशन डॉ. महेश शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर पत्रकार परिषदे मध्ये झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये संस्थेचे सचिव दीपक चौगुले यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांचे निराकरण केले तसेच केआयटीच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली.
रविवार दि. ८ जून २०२५ रोजी होणारा प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनाचा हा कार्यक्रम सर्व पालक, विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः विनामूल्य आहे व हा कार्यक्रम आपल्या सर्व संबंधित शंकांचे नक्कीच निरसन केले जाणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केले.

