कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची पाच वर्षांची मुदत 7 ऑक्टोबर 2025 रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कुलपती कार्यालयाकडून लवकरच नव्या कुलगुरू निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या वतीने एका सदस्याचे नाव निवड समितीसाठी पाठवण्याच्या सूचना कुलपती कार्यालयाने विद्यापीठ प्रशासनाला दिल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाने निवड समितीसाठी तीन नावे पाठवण्यास सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता दिली.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी प्रभारी कुलगुरू नितीन करमळकर यांच्याकडून कार्यभार स्वीकारला होता. कुलपती कार्यालयाने कुलगुरू निवड समितीमध्ये शिवाजी विद्यापीठाचा एक सदस्य देण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाला दिल्या होत्या.
प्रशासनाने तातडीची व्यवस्थापन परिषदेची बैठक घेतली. यात इंदोर येथील आयआयटीचे संचालक सुहास जोशी, हैदराबाद येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्सचे कुलगुरू व्ही. रामगोपाल राब, पंजाबमधील रोपार येथील आयआयटीचे संचालक राजीव अहुजा यांची नावे कुलपती कार्यालयास पाठवण्यास मान्यता देण्यात आली आहे. कुलपती कार्यालयाकडून यापैकी एका सदस्याची निवड कुलगुरू निवड समितीसाठी केली जाणार आहे.

