कबनूर/ प्रतिनिधी
येथील कबनूर-चंदूर रोडवरील जयकुमार कोले यांच्या घरानजिक वीज वितरण कंपनीने मंगळवारी बसविलेला नवा ट्रान्स्फॉर्मर (११ हजार केव्ही साठी) बुधवारी कोसळला. हा नवा ट्रान्स्फॉर्मर शेजारील जुन्या ट्रान्स्फॉर्मरवर कोसळल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
तो जर रस्त्यावर कोसळला असता तर जीवितहानी बरोबर आर्थिक • नुकसानही झाले असते. त्यामुळे वीज कंपनी व मक्तेदाराच्या या भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कबनूर चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने चौकामधील अतिक्रमण काढण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंडर ग्राऊंड केबल टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे व अंदाजपत्रका प्रमाणे होत नसल्याची आनलाईन तक्रार सागर कोले यानी मंगळवारीच केली होती.
बुधवारी नवीन उभा केलेला ट्रान्स्फॉर्मर कोसळल्याने एक प्रकारे वीज कंपनीच्या मक्तेदाराच्या निकृष्ट कामाची पोचपावतीच मिळाली आहे. याठिकाणी जीवितहानी झाल्यास वीज कंपनीस जबाबदार धरले जाईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
