नृसिंहवाडीत संरक्षक जाळी बसवण्याची गरज

कुरुंदवाड

नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील दत्त देवस्थानाला दर गुरुवारी, मराठी सण आणि इतर सुट्टयांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते.
येथे येणारे भाविक प्रथम कृष्णा नदीचे दर्शन घेतात आणि त्यानंतर श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जातात. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक या नदीच्या पाण्याला तीर्थ मानून त्याचे सेवन करतात, तर अनेकजण डोहात स्नान करण्याचा आनंद घेतात.
मात्र, याच डोहात बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या पायऱ्यांपासून संगम घाटापर्यंत संरक्षक जाळी बसवण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, देवस्थान समितीने पाण्याच्या डोह आणि शेवाळलेल्या पायऱ्यांबाबत ठिकठिकाणी दक्षता फलक लावले आहेत. भाविकांना जागृत केले जाते, तरीही या घटना घडत आहेत.
नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरासमोर कृष्णा नदीच्या पात्रात मोठा, खोल पाण्याचा डोह आहे. मंदिराच्या पायऱ्या उतरून भाविक याच डोहातील पाण्यात उतरतात; मात्र या पायऱ्या शेवाळल्याने अत्यंत निसरड्या झाल्या आहेत. त्यामुळे अनेकवेळा पाय घसरून भाविक पाण्यात पडतात. डोहाची खोली जास्त असल्याने आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुडण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत आणि आजही घडण्याची शक्यता आहे. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध भाविकांसाठी हा डोह अधिक धोकादायक ठरत आहे.
नदीच्या पात्रात नेहमी सात पायऱ्या पाण्याखाली असतात. मंदिराच्या उत्तरेकडील बाजूपासून ते संगम घाटापर्यंत अंदाजे तीन पायऱ्यांपर्यंत संरक्षक अँगलची जाळी बसवल्यास संभाव्य दुर्घटना टाळता येऊ शकतात. प्रशासनाने २०२८ च्या कन्यागत महापर्वकाळच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्यासाठी प्रयत्न करावेत.

Scroll to Top