कोल्हापूर / प्रतिनिधी
बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समता, बंधूता, उच्च-नीच भेदभाव, जातीभेद याबरोबरच मानवधर्म हाच श्रेष्ठ धर्म हा विचार मांडला. तोच विचार आज जनमानसात रुजविण्याची, आचरणात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रज्ञा माळकर यांनी येथे केले.
वीरशैव लिंगायत समाजातर्फे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या व्याख्यानात ‘महात्मा बसवेश्वर जीवन कार्य व नव्या पिढीची वाटचाल’ या विषयावर त्या बोलत होत्या. गडहिंग्लज बेलबाग आश्रमाचे महंत सिद्धेश्वर महास्वामी अध्यक्षस्थानी होते. चित्रदुर्गमठामध्ये हा कार्यक्रम झाला.
चित्रदुर्ग मठाचे बसवलिंग महास्वामी, वीरशैव समाजाचे अध्यक्ष किरण सांगावकर, दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाचे अध्यक्ष राजू वाली, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास, महिला मंडळाच्या अध्यक्ष संगीता करंबळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.
माळकर म्हणाल्या, बसवेश्वरांचे ९०० वर्षांपूर्वीचे विचार नव्या पिढीने आचरणात आणण्याची आज खरी गरज आहे. मानवधर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. विश्वाला शांती हा संदेश महात्मा बसवेश्वरांनी दिला. मानवी जीवन सुखमय होण्यासाठी बसवेश्वरांचे विचार प्रेरणादायी आहेत. महंत सिद्धेश्वर महास्वामी म्हणाले, बसवेश्वरांचे विचार हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. सुनील गाताडे यांनी स्वागत व प्रस्तावित केले. दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाचे अध्यक्ष राजू वाली यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत हळदे, ज्येष्ठ नेते नानासाहेब नष्टे, राजेश पाटील चंदुरकर, अशोक माळी, डॉ. सतीश खोतलांडे, चंद्रकांत स्वामी, मंदा कुलकर्णी, स्मिता हळदे आदी उपस्थित होते.

