सातारा (प्रतिनिधी) : “बदलत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांनी फक्त एका शाखेपुरते मर्यादित न राहता इतर शाखांचे ज्ञानही आत्मसात करावे. आंतरशाखीय अभ्यास व संशोधन हे आजच्या काळाची गरज आहे. या दिशेने नवा अभ्यासक्रम विद्यार्थी घडविण्यास मदत करेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व इंडस्ट्रीची गरज ओळखून हा अभ्यासक्रम केला आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्र विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक व रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ.गोविंद कोळेकर यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘एम.एस्सी. भौतिक रसायनशास्त्राच्या सुधारित अभ्यासक्रमावर एक दिवसीय शिक्षक प्रशिक्षण’ या कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शेखर मोहिते होते. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्रज्ञ प्रा. डॉ. के. एम. गरडकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. एस. एस. तेरदाळे, उपप्राचार्य डॉ. अविनाश नलवडे व डॉ. अनिता घारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कोळेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्वांनुसार विद्यापीठांनी अभ्यासक्रमात बदल केले आहेत. अभ्यासक्रम सुधारित करताना ऑन जॉब ट्रेनिंग, ओपन इलेक्टीव्ह, व्हॅल्यू एडिशन आणि कौशल्य विकास या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. हे बदल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे ठरतील. विद्यार्थ्यांनी सर्व शास्त्रशाखांचा अभ्यास करावा, आंतरशाखीय दृष्टीकोन ठेवावा आणि नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मोहिते यांनी या कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, आजच्या युगात शिक्षण प्रणालीत सातत्याने बदल होत आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते ज्ञान न देता संशोधन वृत्ती, नवनिर्मितीची दृष्टी, उद्योगाभिमुख कौशल्ये आणि जीवनमूल्ये यांचा संगम साधणे आवश्यक आहे. शिक्षकांनी या नव्या अभ्यासक्रमाचे बारकावे आत्मसात करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. शिक्षकांनी विषय अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रेरणा आणि संशोधनाची जिज्ञासा निर्माण करून दिली पाहिजे.
प्रास्ताविकामधे उपप्राचार्य डॉ.नलवडे यांनी कार्यशाळेची उद्दिष्टे व महत्त्व सांगून स्पष्ट करत या कार्यशाळेद्वारे प्राध्यापकांना सुधारित अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती, अध्यापनातील नवे दृष्टिकोन, उद्योग व संशोधनाशी निगडित पैलू समजून घेण्याची संधी मिळेल. यामुळे शिक्षक अध्यापन अधिक परिणामकारक पद्धतीने करू शकतील आणि विद्यार्थ्यांना थेट फायदा होईल असे ही त्यांनी नमूद केले.
पहिल्या शैक्षणिक सत्रात प्रा. डॉ. एस. एस. तेरदाळे यांनी थर्मोडायनॅमिक्स व क्वांटम केमिस्ट्री या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. के. एम. गरडकर यांनी पृष्ठीय रचना व विद्युतविश्लेषण तंत्रे दैनंदिन जीवनाशी निगडित उदाहरणांद्वारे समजावून सांगितली. कार्यशाळेस शिवाजी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील सहभागी शिक्षकांनी या दोन्ही सत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेत नव्या अभ्यासक्रमाची रूपरेषा, त्यातील महत्त्वाचे घटक, संशोधन व उद्योगजगताच्या गरजा यावर सखोल चर्चा करण्यात आली.
सूत्रसंचालन प्रा.नयना मल्लकनाथ यांनी केले तर आभार डॉ. अनिता घारे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. रेखा नलवडे, प्रा. दादासाहेब रुपनवर, प्रा. यशवंत गुरमे, प्रा. विशाल अर्जुगडे, प्रा. तृनाल शिंदे, प्रा. संदेश कदम, प्रा. अंजली नलावडे, प्रा. पूजा कदम, प्रा. पूजा मुळीक, डॉ. गणेश कुंभार, श्री. त्रिलोक बर्गे , सचिन साळूंखे व सर्व टीम ने अथक परिश्रम घेतले. ही कार्यशाळा माहितीपूर्ण व उपयुक्त ठरली असून विद्यार्थी व शिक्षक या दोघांच्याही शैक्षणिक प्रगतीसाठी दिशा देणारी ठरली.
