शाहूवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी शनिवारी (दि.१५) दुपारी अडीचच्या सुमारास वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना सुख:द धक्का दिला. मात्र, सरफन गोळा करण्यासाठी तसेच बाजारात व्यापारी, भाजी विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. तसेच वीट भट्टीवरील कामगारांची मोठी धावपळ उडाली. दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात उष्म्याचे प्रमाण अधिक जाणवत होते. उष्माने नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होऊन जीव कासावीस होत होता. तर, अति उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे एखादा वळीव पाऊस पडावा, अशी अपेक्षा नागरिकांची होती. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना सुख:द धक्का मिळाला. शनिवारी सकाळपासूनच हवेत अधिक उष्मा जाणवत होता. दुपारी वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली.
यामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पहिल्यांदा पडलेल्या वळीव पावसाचा आनंद सर्वांनी घेतला. बालचमुने रस्त्यावर येऊन पावसात भिजत-नाचत पावसाचे स्वागत केले. पावसामुळे ऊस, मक्का, हंगामी भाजीपाला यांना पाऊस पोषक ठरला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पावसाने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते.
