
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या महापालिका शाळेतील २१ विद्यार्थी बंगळूर येथील ‘इस्रो’ला अभ्यास भेट देण्यासाठी सोमवारी दुपारी रवाना झाले. तत्पूर्वी महापालिका चौकात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. (ISRO)
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ५६ विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकाविले आहे. पैकी विविध निकषांनुसार २१ विद्यार्थ्यांची निवड या अभ्यास भेटीसाठी झाली.
‘इस्रो’ला अभ्यास सहलीवर पाठविण्यासाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, उपायुक्त साधना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना केएमटीच्या वातानुकुलित बसमधून विमानतळापर्यंत सोडण्यात आले. या विद्यार्थ्यांसोबत प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे, एक शिक्षक, एक शिक्षिका व एक महिला डॉक्टर रवाना झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना क्रीडाईतर्फे सूट व बूट उपलब्ध करून देण्यात आले.
महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरच्या प्रफुल्ल कांबळे या विद्यार्थ्याने इंग्रजीत भाषण केले. त्याच्या अस्खलित इंग्रजी भाषेतील भाषणाने अधिकारीही अचंबित झाले. या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
या भेटीत ‘इस्रो’चे कामकाज, तेथील परिसर पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. उपग्रहांकडून मेसेज पृथ्वीपर्यंत कसे येतात, सॅटेलाईटपर्यंत कमांड कशा पाठवल्या जातात, ‘इस्रो’चे विविध ऑपरेशन्सची लाईव्ह माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
यावेळी आ. अमल महाडिक, आ. जयंत आसगावकर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, पुष्कराज क्षीरसागर, सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, शेखर कुसाळे आदी उपस्थित होते.
