महानगरपालिकेचे कामकाज ई ऑफिस प्रणाली अंतर्गत सुरु

इचलकरंजी / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय, निमशासकीय तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांचे कामकाज ‘ई-ऑफिस’ संगणकीय प्रणाली अंतर्गत करण्याच्या निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाजसुध्दा ई ऑफिस प्रणाली अंतर्गत सुरु करण्यात आले आहे.
या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक, लिपिक, टंकलेखक तत्सम पदावर काम करणारे कर्मचारी यांना प्रशिक्षण देणेबाबत विभागीय संचालक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कोल्हापूर यांचेकडील प्रस्ताव प्राप्त झालेला होता. त्यानुसार कार्यालयीन कामकाज सोयीचे होण्यासाठी कार्यालयीन टिपणी व कार्यालयीन कामकाज (ई-ऑफिस) या विषयावर प्रशिक्षण मंगळवारी आयोजित करणेत आले होते.
प्रशिक्षणाचा शुभारंभ आयुक्त पल्लवी पाटील आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे तसेच उपायुक्त नंदु परळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. महानगरपालिकेकडून ई ऑफिस प्रणालीचा १०० टक्के वापर करत असल्याबाबतची नोंद राज्यस्तरावर घेण्यात आली असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले. विभागीय संचालक स्थानिक स्वराज्य संस्था कोल्हापूर कार्यालयामार्फत जी. टी. महाजन, सहा. कोषागार अधिकारी जळगाव, विजय शिंदे प्रशासकीय अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था कोल्हापूर यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून पी.पी.टी. द्वारे सादरीकरण केले. तसेच अडचणींचे निराकरण केले. प्रशिक्षणासाठी सहा आयुक्त रोशनी गोडे, सहा आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, सहा. संचालक नगररचना प्रशांत भोसले यांचेसह सर्व विभाग प्रमुख, वरीष्ठ लिपिक, स्वच्छता निरीक्षक, लिपिक टंकलेखक उपस्थित होते.

Scroll to Top