इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील श्री. बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये गुढीपाडव्यानिमित्त पहाट गाण्यांची व मराठी नववर्ष स्वागत सोहळयाचे आयोजन रविवारी ३० मार्च रोजी पहाटे ५ वाजता श्री बालाजी माध्यमिक व ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आले आहे.
सध्याच्या आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्यांचे अंधानुकरण करणाऱ्या काळात महाराष्ट्राची अस्मिता, संगीत साहित्याची परंपरा जपण्यासाठी व ती वृध्दींगत करण्याच्या उद्देशाने श्री. बालाजी शिक्षण, सहकार व औद्योगिक समूहाचे संस्थापक अध्यक्ष मदनराव कारंडे यांनी विक्रमनगर परिसरात नववर्ष स्वागत सोहळयाचे आयोजन केले आहे.
सदरच्या कार्यक्रमासाठी स्वरमैफलीचे कलाकार गायक अजित विस्पुते, त्यागराज खाडीलकर, योगिता गोडबोले उपस्थित राहणार आहेत. या कार्यकक्रमाचे निवेदन प्राजक्ता मांडके तसेच संगीत संयोजन ऋतुराज कोरे करणार आहेत.
या पहाटगाणी स्वरमैफिल व नववर्षस्वागत सोहळ्यासाठी इचलकरंजी परिसरातील सर्वांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच पारंपरिक वेशभूषेमधील उपस्थितांमधून प्रथम तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत व त्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
