जवाहर बँकेचे आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेत विलीनीकरण

इचलकरंजी / प्रतिनिधी

हुपरी येथील जवाहर सहकारी बँकेचे कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेत विलीनीकरण करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे विलीनीकरण १० मार्च रोजी होणार असून लवकरच बँकेच्या कर्नाटक राज्यामध्ये हारुगेरी व अथणी येथे दोन नवीन शाखा सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आवाडे म्हणाले, ७ फेब्रुवारी १९६३ रोजी सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली उदयास आलेल्या व प्रकाश आवाडे यांच्या नूतन संकल्पनांच्या माध्यमातून सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये लोकाभिमुख झालेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेमध्ये जवाहर सहकारी बँकेचे विलीनीकरण करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली आहे. जवाहर बँकेचे विद्यमान संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, ग्राहक व अधिकारी आणि कर्मचारी यांनी या बँकेचे स्वेच्छेने
विलीनीकरणास संमती दर्शविली आहे. जवाहर बँकेच्या एकूण ठेवी १२० कोटी रुपये असून ६८ कोटींची कर्जे वितरीत केलेली आहेत. विलीनीकरणामुळे आवाडे जनता बँकेस सहा शाखांसह एकूण २०० कोटींचा व्यवसाय मिळणार आहे. तसेच आवाडे जनता बँकेच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात एकूण ५४ शाखा कार्यरत होणार आहेत. आवाडे जनता बँकेप्रमाणेच जवाहर बँकेच्या ग्राहकांनाही सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. बँकेच्या ६२ वर्षांच्या कालावधीतील हे तिसरे विलीनीकरण असून यापूर्वी पुण्यातील डेक्कन को-ऑप. बँक आणि कर्नाटकात शाखा विस्तार करण्यासाठी तत्कालीन नवकल्याण को-ऑप. बँकेचे विलीनीकरण करून घेतले आहे.
याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष सीए संजयकुमार अनिगोळ, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष सीए चंद्रकांत चौगुले, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, जनरल मॅनेजर किरण पाटील, दीपक पाटील व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Scroll to Top