मध्यरात्रीचे रिक्षा भाडे ५० टक्के जादा घेण्यास मान्यता द्यावी कोल्हापुरातील रिक्षा संघटना कृती समितीची मागणी

कोल्हापूर / प्रतिनिधी

एक मार्चपासून लागू केलेली रिक्षा भाडेवाढ स्वागतार्ह आहे. मात्र, मध्यरात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत भाड्याच्या ५० टक्के जादा घेण्यास मान्यता द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिक्षा संघटना कृती समितीने दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आले. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहरात रात्रपाळीत व्यवसाय करणारे रिक्षा चालक मोठ्या संख्येने आहेत. रिक्षा भाडेवाढ देताना रात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत रिक्षा व्यवसाय अस्तित्वात आल्यापासून रिक्षा भाड्याच्या ५० टक्केपर्यंत जादा भाडे मिळत होते; परंतु १ मार्च २०२५ पासून २५ टक्के भाडे कमी केले आहे. खटुआ समितीच्या सूत्राप्रमाणे भाडेवाढ देताना रात्रीच्या परतीचे वेळेचे भाडे मिळेल, याचा विचार करून आकारणी केली आहे. कोल्हापूर शहर ग्रामीण भागात मोडत असून, शहराचा परीघ आठ किलोमीटर इतकाच आहे. त्यामुळे रात्री बारा ते पाच वाजेपर्यंत प्रवासी सोडून येताना परतीच्या मार्गावर प्रवासी अजिबात मिळत नाहीत. त्यामुळे आम्हास पूर्वीप्रमाणेच रात्री
बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत ५० टक्के पर्यंत जादाचे भाडे करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल.
शिष्टमंडळात चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, अतुल पोवार, मोहना बागडी, रमेश पोवार, तानाजी भोसले, अविनाश दिंडे, अरुण घोरपडे, जाफर मुजावर, युवराज हळदीकर, सुभाष शेटे यांच्यासह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Scroll to Top