कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा लवकरच

कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा सुरू करण्यासाठी इंडिगो एअरलाइन्सच्या वतीने वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर-मुंबई सेवा देण्याचाही प्रयत्न असून स्टार एअरकडून कोल्हापूर-नागपूर मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. या सेवा सुरू झाल्यास कोल्हापूरसह परिसरातील उद्योजक, व्यापारी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.

सध्या इंडिगोकडून हैदराबाद- कोल्हापूर-तिरुपती व तिरुपती – कोल्हापूर -हैदराबाद आणि कोल्हापूर – बंगळूर विमानसेवा सुरू आहे. स्टार एअरकडून कोल्हापूर – मुंबई, कोल्हापूर – अहमदाबाद चार दिवस व कोल्हापूर – बंगळूर तीन दिवस विमान सेवा सुरू आहे. विंटर शेड्युल 28 मार्चला संपत आहे तर एक एप्रिलपासून समर शेड्युल सुरू होत आहे. या अनुषंगाने स्टार एअरलाइन्सकडून कोल्हापूर-नागपूर विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे तर इंडिगो एअरलाइन्सकडून कोल्हापूर – दिल्ली विमानसेवा देण्याचा मानस असून यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर – मुंबई सेवेकरिताही पत्रव्यवहार व बोलणी सुरू आहेत. हैदराबादची प्रवासी संख्या चांगली असल्याने ही सेवा दोन सत्रांमध्ये कशी देता येईल, बंगळूरची सेवाही सकाळच्या सत्रात वाढवता येईल का, यासाठी इंडिगो एअरलाइन्स चाचपणी करत आहे.

Scroll to Top