कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापुरात उन्हाचा जोरदार तडाखा जाणवत आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या तापमानातील चढ-उताराने शनिवारी उच्चांक गाठला. कमाल तापमान तब्बल ३७.५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. त्यामुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असून, दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ कमी होत चालली आहे. येत्या चार दिवसांत दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने कमाल व किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने उसळी घेतल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कोल्हापुरात कमाल तापमान ३८ अंशांच्या जवळ पोहोचले आहे. दुपारी उन्हाच्या जोरदार झळा जाणवत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. बाजारपेठा, मुख्य चौक आणि व्यस्त रस्त्यांवर दुपारच्या वेळी वर्दळ कमी झाली आहे. उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक टोपी, गॉगल, स्कार्फचा वापर करताना दिसत आहेत. शीतपेये, आईस्क्रीमसह फळांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
फेब्रुवारी महिन्यात तापमानाने नवे उच्चांक गाठले होते, अशीच अनुभूती मार्च महिन्यातदेखील जाणवत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा आलेख चढताच आहे.
रात्री व पहाटे थंडी
कोल्हापुरात दिवसा रखरखते ऊन असले, तरी गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होत आहे. किमान २३ अंशांवर असणारे तापमान १९ अंशांपर्यंत खाली घसरल्याने रात्री व पहाटे थंडी जाणवू लागली आहे. किमान तापमान घसरले असले, तरी राज्यात मुंबई व कोल्हापुरातच सर्वाधिक किमान तापमानाची नोंद शनिवारी झाली. इतर जिल्ह्यांमध्ये किमान तापमान कोल्हापूर व मुंबईच्या तुलनेत कमी होते.
