इचलकरंजी/प्रतिनिधी
यड्राव (ता. शिरोळ) येथे मोबाइल कॉल न उचलल्याच्या कारणावरून आत्तेभावास पोटात चाकू मारून जखमी केले. या हल्ल्यात तौहीद फिरोज पिंजारी (वय २०, रा. रेणुकानगर, यड्राव) हा जखमी झाला. त्याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सोहेल जहाँगीर नदाफ (रा. रेणुकानगर यड्राव) याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोहेल नदाफ हा तौहीदचा आत्तेभाऊ आहे. तौहीद याच्या आईचे लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यासाठी सोहेलच्या मोबाइलवर लिंक होते. तौहिदने त्याला फोन केला. परंतु तो त्याने उचलला नाही. त्यामुळे बडबड केल्याने बाचाबाची झाली. याचा राग मनात धरून सोहेल याने तौहीद याच्यावर चाकूने पोटावर वार केला. जखमी अवस्थेत तौहीदला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.