इचलकरंजीत आजपासून किशोर गट जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

इचलकरंजी/ प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

बालभारत क्रीडा मंडळाच्या संयोजनातून कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने इचलकरंजी येथे शनिवारी १५ व रविवारी १६ फेब्रुवारी रोजी किशोर गट कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळाचे मार्गदर्शक राहूल खंजिरे यांनी दिली.
माजी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्रा. डी. एन. कौंदाडे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त सुतारमळा येथील बालभारत क्रीडा मंडळाच्या क्रिडांगणावर दिवसरात्र स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंसाठी वयोमर्यादा १६ वर्षे आणि वजनमर्यादा ५५ किलो निश्चित करण्यात आली असून यामध्ये जिल्ह्यातील ४० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतून निवडलेला कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी संघ मनमाड (जि. नाशिक) येथे २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन १५ रोजी दुपारी ४ वाजता माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, दत्त साखर कारखान्याचे माजी चेअरमन गणपतराव पाटील, मंडळाचे अध्यक्ष उल्हास सुर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे. बक्षीस समारंभ १६ रोजी सायंकाळी ७ वाजता होणार असल्याचेही खंजिरे यानी सांगितले. यावेळी उत्कर्ष सूर्यवंशी, विजय जाधव, आनंदा कौदाडे, मिलिंद नवनाळे, कार्तिक बचाटे, योगेश कौंदाडे, ओंकार धुमाळ, अमोल सूर्यवंशी, अमित पाटील उपस्थित होते.

Scroll to Top