कोल्हापूर: जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे, संशोधन व विकास कक्षाचे संचालक डॉ. संदीप वाटेगांवकर, सहायक प्राध्यापिका पूजा जायगुडे आणि सहायक प्राध्यापक अजित पांढरे यांना भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले. त्यांनी विकसित केलेल्या ऍझो डाय निर्मिती आणि जिवाणुरोधक क्रियाशीलता तपासणीच्या नाविन्यपूर्ण व कार्यक्षम उपकरण पद्धतीला हे पेटंट प्राप्त झाले.
याबाबत बोलताना प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे म्हणाले “आज जगभर वाढत असलेल्या जिवाणुरोधक प्रतिकारशक्ती समस्येच्या पार्श्वभूमीवर हे उपकरण खूप उपयोगी ठरेल. या पेटंटमागे आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा वाटा आहे. हे उपकरण वैज्ञानिक संशोधनाची नक्कीच गती वाढवेल आणि वैद्यकीय, औषधनिर्मिती तसेच पर्यावरण क्षेत्रातही उपयुक्त ठरेल. याच्या मदतीने नवीन आणि प्रभावी संयुगे शोधता येतील, जी सद्याच्या प्रतिजैविकांना पर्याय ठरू शकतात.”
पूजा जायगुडे यांच्या संशोधन मार्गदर्शिका राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूरच्या प्रा.(डॉ.) प्रविणा पिस्ते यांचाही या पेटंट मध्ये समावेश असून त्यांचे यासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रा. पूजा जायगुडे यांनी या यशाचे सर्व श्रेय त्यांच्या संशोधन मार्गदर्शिका प्रा.(डॉ.) प्रविणा पिस्ते व किसन वीर महाविद्यालयाला दिले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, “ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी केलेले हे संशोधन आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या पेटंटमुळे महाविद्यालयाला राष्ट्रीय बहुमान प्राप्त झाला आहे. रसायनशास्त्र विभाग हा नेहमीच विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी संशोधन करावे यासाठी प्रयत्नशील आहे. महाविद्यालय व्यवस्थापनाच्या वतीने मी या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.मदनदादा भोसले, उपाध्यक्ष श्री शंकरराव गाढवे, सचिव डॉ.जयवंत चौधरी, खजिनदार श्री नारायणराव चौधरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) विनोद वीर, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
