कोल्हापूर:

जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत ५६ व्या स्थानी असलेल्या दक्षिण कोरियातील योन्सई विद्यापीठाच्या ऐरोजेल मटेरियल रिसर्च सेंटर व किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग यांच्यात नुकताच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे किसन वीर महाविद्यालयातील विज्ञान शाखेला आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. या करारामध्ये विद्यार्थी- प्राध्यापक विनिमय कार्यक्रम,जोड प्रकल्प, प्रगत संशोधन अशा बहूआयामी बाबी राबविण्यात येणार आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांना यापुढे अभ्यासक्रमाशी संबंधित काही काळ कोरियामध्ये जाऊन नवीन संशोधन करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
योन्सई विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ.एच. एच. पार्क, डॉ. जे. सी. प्युन, डॉ.विनायक पारळे, डॉ.वर्षा फडतरे किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.ज्ञानदेव झांबरे, रिसर्च डायरेक्टर डॉ.विनोद वीर व डॉ.संदीप वाटेगावकर यांच्या स्वाक्षरीने हा करार संपन्न झाला.
योन्सई विद्यापीठाचे प्रोफेसर एच.एच. पार्क यांनी भारतीय संशोधकांबद्दल आदर व्यक्त करत त्यांनी येथील विद्यार्थ्यांचे श्रम, कौशल्य, व ज्ञान कौतुकास्पद असल्याचे सांगितले. या कराराद्वारे योन्सई विद्यापीठ व किसन वीर महाविद्यालय मिळून संशोधन उपक्रम राबवू असेही ते म्हणाले.
सामंजस्य करारानंतर प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे म्हणाले, आमच्या महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व योन्सई विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य करार हा हुशार व संशोधक विद्यार्थ्याना आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनात्मक काम करण्याची संधी देणारा आहे.
डॉ.झांबरे व डॉ वाटेगावकर यांचे योन्सई विद्यापीठाशी गेली दहा वर्षे संशोधनाच्या माध्यमातून संबंध असून या विद्यापीठातील प्रोफेसर डॉ पार्क यांच्यासमवेत १० हुन अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत.
हा करार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी योन्सई विद्यापीठाचे रिसर्च प्रोफेसर डॉ. विनायक पारळे, डॉ. वर्षा पारळे, प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे व डॉ. संदीप वाटेगावकर यांनी अथक परिश्रम घेतले.
या कराराबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी ,खजिनदार मा. नारायण चौधरी, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे, डॉ. हणमंत कणसे व प्रा. भीमराव पटकुरे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
