दानोळी कुस्ती मैदानात किरण मिसाळची बाजी

दानोळी / प्रतिनिधी

दानोळी (ता. शिरोळ) येथील खंडोबा देवाची यात्रा व हजरत पीर गैबीसाहेब दर्गा उरुसानिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात शाहू आखाडा कोल्हापूरचा पै. किरण मिसाळ याने बेनापूरचा पै. प्रथमेश पाटील याला डंकी डावावर अस्मान दाखवत चांदीची गदा पटकावली. मैदानाचे उद्घाटन रावसाहेब भिलवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी एक नंबर कुस्तीसाठी चांदीची गदा शशिकांत चंदोबा व यात्रा कमिटी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बापूसो दळवी, ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकर पुजारी, गुंडाजी पाटील, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके प्रमुख उपस्थित होते.
दोन नंबरच्या चांदीची गदा लढतीत कोल्हापूरचा भोसले तालमीचा पै. मनोज कदम व सतपाल नागटिळक यांची लढत बरोबरीत सोडवण्यात आली. तीन नंबरच्या कुस्तीत शाहू आखाडा कोल्हापूरचा पै. किरण जाधव यांने मोतीबाग तालमीचा पै. अतुल डवरी याच्यावर घुटना डावावर विजय मिळवला.
यावेळी १२५ पेक्षा जास्त चटकदार कुस्त्या झाल्या. पंच म्हणून सादिक पटेल, अमोल खंडाळे, शहाजी पवार, अमर गंजिले व रवी पुजारी यांनी पंच म्हणून काम पाहिले. कुस्ती समालोचन पै. नंदकुमार सुतार व पै. जोतीराम वाझे यांनी केले.
यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्रावण गावडे, उपाध्यक्ष शीतल कौलापुरे, कार्याध्यक्ष रवींद्र दळवी, गब्रू गावडे, महेश दळवी, गणेश साळोखे, अमित दळवी, बंडा राऊत, दादा खोत, विनोद थोरात यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, यात्रा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार कुस्ती कमिटी प्रमुख सावकर दळवी यांनी मानले.

Scroll to Top