कोल्हापूर / प्रतिनिधी
टाऊन हॉल, छत्रपती चिमासाहेब चौक परिसरात असणाऱ्या करवीर पंचायत समितीच्या पार्किंग आवारातील विलायती चिंचेचे झाड अज्ञाताने जाळण्याचा प्रयत्न केला. जागृत निसर्गप्रेमींनी तातडीने याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाचा बंब आणि जवानांनी पाण्याचा फवारा मारून आगीवर नियंत्रण आणून त्याला जीवदान दिले.
आग लागल्याचे जवळच असणाऱ्या चहा-नाष्टा व्यावसायिक, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मकरंद ऐतवडे व निसर्ग मित्र अमोल बुड्डे यांना दिसले. त्यांनी घागरीने पाणी ओतून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा बंब व जवान तातडीने दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण आणले.

