कार्तिक शुद्ध एकादशी / प्रबोधिनी एकादशी

कार्तिकी एकादशी

कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते.
ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.

कार्तिक शुद्ध एकादशी तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात.

तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरू होतात..

पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस.या रात्री श्रीविष्णूला बेल वाहतात आणि शिवाला तुळशीपत्र वाहतात. याला `हरिहर-भेट’ किंवा `हरिहर-अद्वैत’ म्हणतात. कार्तिकी एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा लंघून (ओलांडून) श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत आहे.

दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते; म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस ‘देवशयनी एकादशी’ म्हटले आहे; त्या दिवशी देव झोपी जातात, अशी समजूत रूढ आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी (बोधिनी, देवोत्थानी) एकादशी’ असे म्हटले जाते. नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतो, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो.

वरील माहिती आमच्या वाचनात आली असून आम्ही याच्याशी सहमत आहोतच असे नाही .

Scroll to Top