इचलकरंजी/प्रतिनिधी –
संग्रहित छायाचित्र
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याने साखरेची रंगमापन (इकुम्सा) पध्दत अनुसरून दर्जेदार साखर उत्पादन केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली या संस्थेने कारखान्यास सर्वोत्कृष्टता पुरस्कार जाहीर केला आहे.
दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली या संस्थेमार्फत ३ ते ५ मार्च या कालावधीत साखर विश्लेषण पध्दती आयोग चे आंतरराष्ट्रीय ३४ वे सत्र नवीदिल्ली येथे आयोजित केले आहे. या परिषदेमध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास हा आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
इकुम्सा ही साखर विश्लेषणामध्ये एकसमानता आणि अचुकता तसेच साखरेची शुध्दता व रंगमापनातील गुणवत्तेचे वर्गीकरण करण्यासाठी व आंतरराष्ट्रीय मानके तयार करण्यासाठी १८९७ मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये स्थापन करण्यात आली. देशातील वाढत्या ग्राहक जागरूकतेमुळे साखरेच्या गुणवत्तेबद्दल कडक कायदे आणि नियम तयार करण्यात आले. साखरेच्या शुध्दतेची एक सामान्य आंतरराष्ट्रीय भाषा तयार करण्यासाठी रंगमापन पध्दत विकसित केली. ज्यामुळे उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचे वर्गीकरण जागतिक मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने जलद आणि सहजतेने करणे शक्य झाले. इकुम्सामध्ये प्रामुख्याने साखर आयात आणि निर्यात करणाऱ्या देशातील सरकारकडून नियुक्त केलेले प्रतिनिधी राष्ट्रीय समितीमध्ये असतात.
सन १८९७ पासून आजपर्यंत ३३ परिषदा वेगवेगळ्या देशातून झालेल्या आहेत. आशिया खंडामध्ये १८९७ नंतर दुसऱ्यांदा चालू वर्षी दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली या संस्थेकडे या परिषदेचे आयोजन करण्याचे यजमानपद मिळालेले आहे. यापूर्वीच्या सर्व परिषदांचे आयोजन युरोप किंवा अमेरिका खंडात आयोजित करण्यात आले होते.
सध्या भारत जगातील सर्वात मोठा ग्राहक आणि साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असल्याने जागतिक साखरेच्या वापरात १५ टक्के आणि उत्पादनात २० टक्के वाटा भारताचा असून नवी दिल्ली येथे होणाऱ्या ३४ व्या इकुम्सा परिषदेचे अनन्य साधारण महत्व आहे.
या पुरस्कारामुळे कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यावरील विश्वास आणि पारदर्शकतेमध्ये मोलाची भर पडली असल्याचे कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी सांगितले. कारखान्यास मिळालेल्या पुरस्कारााबद्दल कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद शेतकरी, संचालक, ऊस तोडणी मजूर-वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी-कर्मचारी-कामगार यांचा मोलाचा वाटा आहे, असे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे म्हणाले.

