कुरुंदवाड / प्रतिनिधी
कै. साथी सुरेंद्र आलासे क्रीडानगरी, कुरुंदवाड येथे रंगलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ३० किलो गटात जय हनुमान-हेरले आणि एस.पी. स्पोर्टस्-पुणे या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश करत उपस्थितांची मने जिंकली. युवक संघटना पट्टणकडोली संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
६० किलो गटात हिंदवी मंडळ-कौलव व स्वराज्य मंडळ – इचलकरंजी या संघांनी विजयी सलामी देत दमदार सुरुवात केली. रविवारी सायंकाळी अंतिम सामने होणार आहेत. येथील तबक मैदानात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेतील ६० किलो गटातील सामन्याचे उद्घाटन आ. अशोकराव माने यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी साधना मंडळाचे अध्यक्ष स. ग. सुभेदार होते. यावेळी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव उगळे, महावीर पोमाजे, अॅड. देवराज मगदूम, जयपाल आलासे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
३० किलो गटातील एस. पी. स्पोर्टस्-पुणे व बालभारत-इचलकरंजी यांच्यातील सामना प्रेक्षकांची श्वास रोखणारा ठरला. १४ विरुद्ध १५ अशा एका गुण फरकाने पुणे संघाने अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीत जय हनुमान-हेर्ले संघाने युवक संघटना-पट्टणकडोली संघावर १६ विरुद्ध १५ गुणांनी विजय मिळवला.

