भारताच्या विजयानंतर कोल्हापूरकरांचा जल्लोष

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’, ‘भारताचा विजय असो..’ यासह विविध प्रकारच्या घोषणा, भारताचा तिरंगा ध्वज, भगवा ध्वज, भारतीय खेळाडूंचे फोटो सोबत घेऊन आतषबाजी व विविध रंगांची उधळण करत कोल्हापूरकरांनी टीम इंडियाच्या चॅम्पियन्स कप विजयाचा जल्लोष साजरा केला. चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रविवारी अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवून चषकावर देशाचे नाव कोरले. यानंतर कोल्हापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.

शहरातील विविध पेठा उपनगरे व ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात जल्लोषी मिरवणुका काढण्यात आल्या. साप्ताहिक सुट्टीचा रविवार आणि चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी विशेष नियोजन केले होते. अनेकांनी एकत्रित बसून सामन्याचा आनंद लुटला. तालीम संस्था, तरुण मंडळांची कार्यालये, पेठांमधील मुख्य चौक, उद्याने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, थिएटर्स व लॉन्समध्ये मोठ्या स्क्रीनवर सामना पाहण्याचे नियोजन करण्यात आले होते. तरुण मंडळे, तालीम संस्थांच्या दारात स्टेरिओ लावून आबालवृद्धांसह तरुणींनी जल्लोष केला.

सामना संपण्यापूर्वीच जयघोष, टाळ्या-शिट्ट्या, पिपाण्यांसह विविध प्रकारची वाद्ये घेऊन दुचाकी-चारचाकी वाहनातून लहान मुले तरुण, महिला, मुलींनी शिवाजी चौकात धाव घेतली. महापालिका चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, गंगावेश, बागल चौक, आझाद चौक, रंकाळा चौपाटी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जल्लोषाचे रिल्स तयार करण्यासाठी अनेकजण मोबाईल घेऊन सज्ज होते. बिंदू चौक, बुधवार पेठ, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, राजारामपुरी, शाहूपूरी, न्यू शाहूपुरीसह गल्ली बोळात जोरदार आतषबाजी क्रीडाप्रेमींनी केली. दोन ते अडीच तास विजयाचा जल्लोष सुरू होता.

Scroll to Top