भक्तिमय वातावरणात जोतिबाचा पहिला खेटा

संग्रहित छायाचित्र

दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या खेट्यांना रविवारी उत्साहात सुरुवात झाली. पहिला खेटा भक्तिमय वातावरणात झाला. पहाटेपासूनच जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. चांगभलच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर आणि डोंगर दुमदुमून गेला.

रविवारी पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडले. त्यानंतर जोतिबाची पाद्यपूजा व काकड आरती सोहळा झाला. सकाळी आठ वाजता जोतिबासह सर्व देवदेवतांना अभिषेक घालण्यात आला. यानंतर जोतिबाची खडी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. दुपारी साडे अकरा वाजता ‘श्रीं’चा धुपारती सोहळा उंट घोडे, मानकरीसहित झाला. दिवसभरात असंख्य भाविकांनी कुलदैवत दख्खनचा राजाचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच भाविकांची डोंगरावर मांदियाळी असल्याने पार्किंग जागा वाहनांनी फुल्ल भरून गेले होते. सायंकाळी उंट, घोडा अशा लवाजम्यासहित आणि गुलाल- खोबर्‍याची उधळण करत ‘श्रीं’चा पालखी सोहळा झाला. दिवसभरात कोडोली पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी कुलदैवत जोतिबाचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सदस्य हेमंत भोरे यांनी त्यांचे स्वागत केले. पुजारी उत्कर्ष समितीतर्फे त्यांना ‘श्रीं’चा फोटो देऊन सत्कार केला. यावेळी प्राधिकरणसंदर्भातील विषयात ग्रामस्थांना विचारात घेऊनच विकास केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Scroll to Top