इचलकरंजी / प्रतिनिधी
संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्राला पदवीधर करण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. त्यांच्या शिक्षण प्रसाराचा वसा -वारसा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सक्षमपणे पुढे नेला आहे. पुढची पिढी प्रगत शिक्षण घ्यावी याविषयीची त्यांची कळकळ समाजाला नवी दिशा मिळवून देईल, असे प्रतिपादन निवृत्त कुलगुरू शिक्षण तज्ञ डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
दक्षिण भारत जैन सभेची पदवीधर संघटनेचा ३५ वा वर्धापन दिन व जीवनगौरव प्रशस्ती प्रदान सोहळा येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ साळुंखे बोलत होते. यावेळी स्वर्गीय वसंत भीमगोंडा पाटील कोथळीकर जीवनगौरव माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना सपत्नीक माजी नगराध्यक्ष किशोरी आवाडे यांना डॉ. साळुंखे, विमलताई देवगोंडा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ. ए एन उपाध्ये जैन साहित्य निर्मिती व संशोधन पुरस्कार स्वर्गीय प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी जाहीर झाला असून तो त्यांची कन्या डॉ. सुनिता राजेंद्र गाठ यांना दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डी . डी. मंडपे यांनी स्वागत तर प्रास्ताविक प्रा. ए. ए. मुडलगी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. ए. ए. मासुले यांनी करून दिला. स्मरणिकेचे प्रकाशन संघटनेचे संस्थापक आर पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . प्रा. डॉ. शीतल पाटील यांनी स्मरणिका निवेदन केले. सन्मानपत्राचे वाचन डॉ. जयपाल चौगुले, प्रा. एम के. घुमाई यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा सन्मान सन्मती बँकेचे अध्यक्ष सुनील पाटील, पॉवरलूम असोचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
सत्काराला उत्तर देताना प्रकाश आवाडे यांनी, मला निवृत्त करण्याच्या उद्देशाने जीवन गौरव पुरस्कार द्यायचे कोणी ठरवले असले तरी मी थांबणार नाही. माझे सामाजिक कार्य पुढेही चालू राहील. मी धर्माचरण करणारी व्यक्ती आहे. परंतु आज समाजाने पंचकल्याण सोहळ्यावर लाखोंचा खर्च करण्याऐवजी त्यातील काही रक्कम गावातील शाळा सुधार, शैक्षणिक कार्यासाठी वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. संयोजक संस्थांनी शैक्षणिक संस्था सुरू करून नव्या पिढीला या प्रवाहात पुढे नेण्यासाठी गतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योग निर्यात करणे आणि महिला सक्षमीकरण करणे हे कार्याचे प्रमुख ध्येय यापुढे असणार असल्याचे सांगितले.
भालचंद्र पाटील यांनी दत्तक पालक योजनेला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले . सभेची सदस्य संख्या वाढवण्याबरोबरच विविध उपक्रम गतीने राबवणार असल्याचे सांगितले . यावेळी सभेचे माजी अध्यक्ष डॉक्टर डी ए पाटील, कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनीही यांचीही भाषणे यावेळी झाली. बी. बी शेंडगे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन जयपाल चौगुले, तीर्थंकर माणगावे यांनी केले.

