यड्राव / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र
इचलकरंजीतील माजी नगरसेवक पुत्राने बेदरकार जेसीबी चालवत पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात जेसीबी चालकासह चौघेजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर जेसीबी जयसिंगपूरच्या दिशेने भरधाव निघाला होता. वाहतूक पोलिस व नागरिकांनी खोतवाडीजवळ जेसीबी पकडला. यावेळी नागरिकांनी चालकाला बेदम चोप दिला. ही घटना यड्राव फाटा ते पंचगंगा साखर कारखाना मार्गावर जय भवानी अपार्टमेंटच्या शहापूर वळणावर घडली.
घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. माजी नगरसेवक पुत्र जेसीबी चालक स्वप्निल मारुती पाथरवट (वय २७, रा. पाटील मळा, इचलकरंजी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
स्वप्निल हा जेसीबी (क्र. एमएच ०९ एफझेड ९७५९) घेऊन यड्राव फाट्याच्या दिशेने जात होता. तुळजाभवानी अपार्टमेंट वळणावर एका मोटारसायकलला त्याने धडक दिली. तसेच पुढे येऊन वळणावर मालवाहू अपे रिक्षा (क्र. एमएच १० झेड ५३२०), स्पोर्टस बाईक (क्र. एमएच ०९ एक्स ७४७३), व मोपेड (क्र. एमएच १० बीएन ८४६०) या वाहनांना धडक दिली. त्यानंतर स्विफ्ट कारसह आणखी दोन वाहनांना धडक दिली. या अपघातात अॅपे रिक्षा व स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले आहे. रिक्षामधील सचिन गणपती कांबळे (वय ४४), सुनीता सचिन कांबळे (४०, दोघे रा. शिवाजी कॉर्नर कबनूर) यांच्या हात, पाय, गुडघा, कंबरेला तर स्विफ्ट कार चालक आदिनाथ खड्डयाच्या पायाला दुखापत झाली आहे.
स्वप्निल जेसीबी भरधाव वेगात घेऊन तारदाळ नाका ते यड्राव फाटा मार्गे जयसिंगपूरकडे जात होता. यावेळी यड्राव फाट्याजवळ वाहतूक पोलिस संदीप पाटील व मारुती पाटील यांनी त्याला अडवत असताना त्यांच्याच अंगावर जेसीबी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रसंगावधान राखत बाजूला होऊन त्यांनी मोटारसायकलचा सायरन वाजवत पाठलाग केला. खोतवाडी जवळ नागरिक व पोलिसांनी जेसीबी चालकाला पकडले. यावेळी प्रचंड संख्येने जमलेल्या नागरिकांनी स्वप्निलला बेदम चोप दिला.
