जयसिंगपूर / प्रतिनिधी
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर झपाट्याने वाढत असून, राज्य सरकार आणि कृषी विज्ञान केंद्र यांचा या दिशेने ठोस पुढाकार आहे. अमेरिकेनंतर भारतात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, जिथे एआयच्या आधारे शेती सुधारण्याचे प्रयोग प्रत्यक्ष अंमलात आणले जात आहेत. हवामान बदल, कीड नियंत्रण, माती परीक्षण, खत व्यवस्थापन आणि पीक उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी एआय अत्यंत उपयुक्त ठरत आहे. अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे विशेषतज्ञ संतोष करंजे यांनी केले.
येथे सहकारमहर्षी शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात शरद कारखाना व शरद कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस पीक परिसंवाद झाला. यावेळी करंजे बोलत होते. प्रारंभी स्व. शामराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक सुभाषसिंग रजपूत यांनी केले.
दरम्यान, शेतकऱ्यांनी एआय संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन केले. आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, उसाचे क्षेत्र व दर यांना मर्यादा येत चालल्या आहेत. यामुळे उत्पादन खर्च वाढत असून, साखर कारखान्यांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी, शेतीमध्ये डेटा विश्लेषणाच्या साहाय्याने निर्णय घेणं आवश्यक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वैज्ञानिक अधिकारी डॉ. समाधान सुरवशे, कृषी अधिकारी चंद्रकांत जांगडे, शरदचे व्हा. चेअरमन थबा कांबळे, अमरसिंह पाटील, विजय देसाई, मल्लाप्पा चौगुले, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. आवटी, प्रभारी कार्यकारी संचालक एम. एम. पट्टणकुडे, रणजित पाटील यांच्यासह सर्व संचालक, सभासद, शेतकरी उपस्थित होते.

