खंडपीठासाठी दसरा चौकात बेमुदत उपोषण सुरू

संग्रहित छायाचित्र

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीच्या सहकार्याने, पदवीधर मित्रचे माणिक पाटील-चुयेकर यांनी रविवारपासून ऐतिहासिक दसरा चौकात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी उपोषणाला विविध स्तरातून पाठिंबा देण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. सर्जेराव खोत म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी दीर्घकालीन लढा सुरू आहे. अन्य शहरानेही केलेल्या मागण्या अमान्य करण्यात आल्या आहेत. मात्र, कोल्हापूरची मागणी न्याय आणि रास्त असल्याने त्याबाबत सरकार सकारात्मक आहे; पण अजूनही निर्णय होत नाही. सरकारने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून खंडपीठाबाबतचा निर्णय त्वरित घ्यावा.

ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, खंडपीठासाठी सुरू असलेले आंदोलन आता अंतिम टप्प्यात आले आहे. सर्वांनीच त्यात सहभागी होऊन अंतिम निर्णय होईपर्यंत ते अधिक नेटाने पुढे नेले पाहिजे. रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे म्हणाले, आमच्या विद्यार्थी दशेपासून हे आंदोलन करत आहोत. सर्व अनुकूल असताना आणखी किती दिवस खंडपीठाची प्रतीक्षा करायची?

कोल्हापूरची मागणी न्याय आहे. सर्व निकषात कोल्हापूर बसत असताना गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील, नागरिक, लोकप्रतिनिधी संघर्ष करत असतानाही अद्याप हा निर्णय प्रलंबित आहे. यामुळे याबाबत जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार केल्याचे माणिक पाटील- चुयेकर यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, कादर मलबारी, शिवसेनेचे किशोर घाडगे आदींसह वकील उपस्थित होते.

Scroll to Top