१६ फेब्रुवारीपासून शाहू कारखान्याकडून वाढीव दर

कागल / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

कागल येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत चालू गळीत हंगामात दि. १६ फेब्रुवारीपासून गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रोत्साहनात्मक वाढीव ऊस दर देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी दिली. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

यावेळी बोलताना घोरपडे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांच्या पश्चातही सभासद, शेतकरी केंद्रबिंदू मानून अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. या गळीत हंगामात १५ जानेवारी अखेर गळीतास आलेल्या उसाची प्रति टन ३ हजार १०० रुपये प्रमाणे होणारी बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.
कारखाना व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार १६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ५०, तर १ मार्चपासून पुढे गळीत हंगाम समाप्ती पर्यंत येणाऱ्या उसास प्रतिटन १०० रुपये वाढीव प्रोत्साहनात्मक दर देण्यात येणार आहे.

Scroll to Top