जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि संग्रहालय शिवतीर्थ उभारण्यात आले आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा सोमवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. सांगली-कोल्हापूर रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील या भव्य स्मारकाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
पत्रकात असे म्हटले आहे की, जयसिंगपूर शहरात गेल्या ४० वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा ही शिवभक्तांची मोठी इच्छा होती. तशी वारंवार माकणी होत होती. त्यानुसार आमदार यड्रावकर यांच्या पुढाकारातून शिवस्मारक, अत्याधुनिक संग्रहालय व अभ्यासिका उभारण्यात आली आहे.
या भव्य सोहळ्याला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, नगरविकास राज्यमंत्री व सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार व मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.

