कोल्हापूरच्या वातावरणावर हवामान बदलाचा घाला

हवामान बदलाची झळ आणि प्रदूषणाचा राक्षस कोल्हापूरच्या आल्हाददायक व पोषक वातावरणाला गिळंकृत करून टाकत चालला आहे. हवामान बदलामुळे आणि हवा प्रदूषणामुळे गेल्या चाळीस वर्षांत कोल्हापूरचे तापमान कमालीचे बदलले आहे. जिल्ह्यात थंडीचे दिवस घटू लागले आहेत, किमान तापमानात वाढ होत आहे, तसेच पर्जन्यमानातील बदलामुळे महापूर आणि जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होण्याचा धोका वाढत आहे. याचा गंभीर परिणाम पिकांवर व नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो, असा धक्कादायक निष्कर्ष पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या हवामानशास्त्र विभागाच्या संशोधनातून समोर आला आहे. यामुळे कोल्हापूरकरांनो, ही धोक्याची घंटा समजून वेळीच सावध होण्याची गरज आहे.

कोल्हापुरात ऐन हिवाळ्यात आपल्याला कधी दिवस-रात्र उकाडा, तर कधी दिवसा उन्हाचे चटके अन् रात्री कडाक्याची थंडी, असे टोकाचे (एक्स्ट्रीम) हवामान बदल दिसत आहेत. गेल्या 40 वर्षांत कमाल व किमान तापमानातील अंतरात होणार्‍या चढ-उताराला व पर्जन्यमानातील वाढीला हवामान बदल व हवा प्रदूषण जबाबदार आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दोन तापमानातील या चढ-उताराचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर व शेतीला बसत आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या हवामानशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी ‘आरक्लाईमडेक्स मॉडेल’चा वापर करून केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. हा संशोधन अहवाल ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्च अ‍ॅग्रोनॉमी’मध्ये प्रकाशित झाला आहे.

या संशोधन अभ्यासात कोल्हापूर जिल्ह्यात दैनंदिन तापमान श्रेणी; अर्थात कमाल आणि किमान तापमानातील फरक व पर्जन्यमानाचा गेल्या 40 वर्षांतील डेटा संकलित करून ‘आरक्लाईमडेक्स मॉडेल’मध्ये भरण्यात आला. या विश्लेषणात 27 मूलभूत निर्देशांकांचा वापर केला. यातील 19 निर्देशांकांपैकी पाच निर्देशांकांत घसरण, तर बारा निर्देशांकांचा आलेख चढता होता. हा चढता आलेख कोल्हापूरला बसत असणार्‍या हवामान बदलाची झळ दर्शवतो.
दोन तापमानातील बदलाचा पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. रात्री थंडी आणि दिवसा कडक उन्हामुळे पिकांच्या उंचीवर परिणाम होत आहे. पिकांना पाणी देण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागत होता, आता 8 दिवसांत पाणी द्यावे लागत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास दुष्काळासारखी स्थितीदेखील उद्भवू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
कमाल आणि किमान तापमानातील अंतर म्हणजेच ‘डायनल टेम्परेचर रेंज’ (डीटीआर). सकाळच्या आणि रात्रीच्या तापमानातील हा फरक असतो. यामध्ये अंतर वाढले किंवा कमी झाले तर त्याचा शेतीवर आणि मानवी आरोग्यावर परिणाम होतो. गेल्या 40 वर्षांतील कोल्हापुरातील सध्याच्या तापमानाचा आलेख पाहिल्यास, किमान तापमानासोबत कमाल तापमानातही वाढ होत आहे. यामुळे या दोन तापमानातील अंतरात सतत फरक पडत आहे.
तापमानातील या फरकाचा आरोग्यावरदेखील गंभीर परिणाम होतो. तापमानातील असंतुलनामुळे हृदयविकार, श्वसनाचे विकार आणि संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढते. विशेषतः, वृद्ध आणि लहान मुलांसाठी हा बदल अधिक धोकादायक ठरू शकतो.

Scroll to Top