इचलकरंजीत वटपौर्णिमा उत्साहात

इचलकरंजी/ प्रतिनिधी

अखंड सौभाग्य आणि जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, अशी मनोकामना करत महिलांनी ‘वटपौर्णिमा’ उत्साहात साजरी केली. वटपौर्णिमचे औचित्य साधून इचलकरंजी शहर परिसरात वडाच्या झाडाच्या पुजेसाठी ठिकठिकाणी महिलांनी गर्दी केली होती.
पावसाळा सुरु झाला की, पहिला सण येतो तो म्हणजे वटपौर्णिमा. यादिवशी सुवासिनी महिला काठापदराची हिरवी साडी, साजशृंगार करून, पारंपरिक वेशभूषा करून वडाचे झाड पूजतात. झाडाभोवती दोर गुंडाळताना सात जन्मी हाच पती मिळू दे आणि अखंड सौभाग्य लाभू दे, अशी कामना करतात. या सणाच्या पूर्वसंध्येला वडाची फांदी, ओटीचे साहित्य, दोर, वस्त्रमाळ, धूप-दीप, आंबा, फणस या पूजेच्या साहित्यांच्या खरेदीसाठी महिलांनी बाजारात गर्दी केली होती. पती-पत्नीतील स्नेहबंध दृढ करणारा हा दिवस उपवास व संकल्प करुन साजरा होतो. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वट वृक्षाला प्रदक्षिणा घालून सुताचे फेरे गुंफतात.
सौभाग्यवती महिलांनी पारंपारीक वेशभुषेत रसना कॉर्नर, मंगलधाम, गंगामाई विद्या मंदिर, प्रांत कार्यालय, राणी बाग, शिवेचा मारूती मंदिर, यशवंत कॉलनी, पाटील मळा, जवाहरनगर, तुळजाभवानी मंदिर तांबेमाळ यासह शहर परिसरात ठिकठिकाणी वडाच्या झाडाची पुजा करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी महिलांनी वडाच्या झाडाची विधीवत पुजा करुन जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून झाडाला प्रदक्षिणा घालून सुताचे फेरे गुंफले. एकुणच निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि पती-पत्नीतील स्नेहबंध दृढ करणारा हा सण शहर परिसरातील महिलांनी उपवास आणि संकल्प करुन उत्साहात साजरा केला.

Scroll to Top