इचलकरंजी / प्रतिनिधी
राज्य शासनाच्या वतीने शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश लागू केला आहे. त्या विरोधात मनसेच्या वतीने येथील महात्मा गांधी चौकामध्ये आंदोलन केले. यावेळी मनसेच्या वतीने शासनाचा अध्यादेश फाडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या व राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी शासनाचा निषेध करताना मनसेच्या वतीने मराठी भाषेची गळचेपी करण्याचे धोरण राज्य शासन करीत असल्याचा आरोप करून आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही अशीही घोषणा केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक संभाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक संतांची भाषा ही मराठीच असताना मराठी माणसावर हिंदीची सक्ती नको अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी मनसेचे प्रताप पाटील, राजेंद्र निकम, ऋषीकेश मराठे, अभिषेक सारडा, तन्मय तांबे, रसिका साळुंखे, सौरभ संकपाळ, संदीप पोवार, आदींसह मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

