इचलकरंजी/प्रतिनिधी
‘आत्मसंरक्षणाची कला जीवनात आपणास अधिक स्थैर्य देते. या शिबिरातील महिलांचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहता पुढील काळात यापेक्षाही व्यापक शिबिराचे आयोजन करता येईल. आपणासह इतर भगिनींनी यामधला सहभाग वाढवत स्वसंरक्षणाचा मंत्र जपावा’ , असे आवाहन लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या खजिनदार प्रीती पोदार यांनी केले.
किडझी प्री स्कूलच्या वतीने आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या सहकार्याने पाच दिवसीय लेडीज सेल्फ डिफेन्स वर्कशॉप पार पडले. या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी सौ. पोतदार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी किडझी प्री स्कूलच्या को ऑर्डिनेटर सौ नीतू पारिक होत्या. व्यासपीठावर सीनियर ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका सौ किरण चौगुले, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या सदस्या प्रमिला तोष्णीवाल, सुनीता अग्रवाल, स्मिता नवाल, ग्रँडमास्टर रविकिरण चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. समारोपप्रसंगी महिला शिबिरार्थीनी आक्रमक फटके व बचावाचे अनेक प्रकार करून दाखवले. महिला शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट सहभागाचे प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले. या शिबिरातील सहभागातून एक वेगळाच अनुभव मिळाल्याच्या भावना यावेळी महिला शिबिरार्थीनी व्यक्त केल्या. कमी कालावधीत वेगवान फटके, पंचेस, किक्स, आणि शत्रूस नेस्तनाबूत करण्याचे डावपेच सहजपणे शिकता आले. आम्हास अशा प्रकारचा सराव करता येईल याचा विश्वास ही वाटत नव्हता. मात्र रविकरण चौगुले सर आणि सौ किरण चौगुले मॅडम यांच्या सोप्या पद्धतीने करवून घेण्याच्या पद्धतीमुळे आम्हाला सर्व डावपेच आत्मसात करता आले, अशी मनोगते उपस्थित महिलांनी व्यक्त केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्ष हेमा डालिया, सचिव किरण महाजन, ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका रिया चौगुले, श्रेया चौगुले, कुलदीप राजपुरोहित, गायत्री लोले आदि सिनिअर कराटेपटूनचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी सौ नीतू पारिक यांनी आभार मानले.