इचलकरंजीत कबड्डी अजिंक्यपद, निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ

इचलकरंजी / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि जयहिंद मंडळातर्फे मंडळाचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू स्व. मल्हारपंत बावचकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कोल्हापूर जिल्हा कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ झाला. या स्पर्धेत पुरुष गटातील ३० आणि महिला गटातील ८ संघ सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी शिवशाहू चिखली आणि शाहू सडोली या संघांनी विजयी सलामी दिली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व कै. बावचकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडू माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी आ. प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पूजन झाले. सतीश डाळ्या, शंकर पोवार, अमित कागले, शशांक बावचकर, दिलीप ढोकळे, जयवंत लायकर, प्रकाश दत्तवाडे, सुनील पाटील आदींसह क्रीडारसिक उपस्थित होते.

Scroll to Top