इचलकरंजी /प्रतिनिधी
इचलकरंजी येथे कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने २५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अश्विनी महेश ओझा या संशयित महिलेवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर चारचाकी वाहन खरेदी व्यवहारात २० लाख ५० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अमरजित अशोक घाट या संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घर आणि व्यवसायासाठी ३ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून व कागदपत्रे घेऊन २५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अश्विनी महेश ओझा (रा. वनारसे हॉस्पिटलजवळ) या संशयित महिलेवर गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद संतोष माणिकचंद मालू (वय ५४, रा. कागवाडे मळा) यांनी दिली. पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी ही माहिती दिली. कागवाडे मळा येथे राहणारे संतोष मालू यांना २०२२ मध्ये घर बांधकामासाठी कर्जाची गरज होती. त्यासाठी संशयित ओझा हिने ३ कोटी रुपये कर्ज मंजूर करून देतो, असे सांगितले होते. तिने कमिशनची मागणी करत कर्ज मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे घेतली. वेळोवेळी हिला संतोष व प्रतीक मालू या पिता-पुत्रांनी आपल्या खात्यावरून कमिशनपोटी आरटीजीएसद्वारे २५ लाख ४० हजार रुपये दिले; परंतु तिने आजअखेर कर्ज मंजूर करून दिले नाही. फसवणूकप्रकरणी सौ. ओझा हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस नाईक प्रसन्न कांबळे करत आहेत. मालू यांनी पैसे परत मागितले असता सौ. ओझा हिने सारस्वत बँकेचा १२ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश दिला; परंतु हा धनादेश वटला नाही.
चारचाकी वाहन खरेदी व्यवहारात २० लाख ५० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अमरजित अशोक घाट (रा. विकासनगर, इचलकरंजी) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी प्रतीक संतोष मालू (३०, रा. कागवाडे मळा) याने फिर्याद दिली. कागवाडे मळा येथे राहणारे प्रतीक मालू यांची कार संशयित अमरजित घाट याने विकत घेतली. त्यासाठी २० लाख ५० हजार रुपये खरेदीचा करार झाला. त्यापोटी मालू यांना ५ लाख रुपये रोख आणि उर्वरीत १५ लाख ५० हजाराचे कर्ज भरण्याबाबत घाट याने करार केला. घाट याने रोख रकमेपोटी बँक ऑफ बडोदाचे दोन धनादेश देऊन वाहन ताब्यात घेतले. मात्र घाट याने दिलेले दोन्ही धनादेश न वटता परत आले. याबाबत मालू यांनी विचारणा करुन वाहन परत मागितले असता घाट याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे प्रतीक मालू यांनी तक्रार दिली.