इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरातील बसस्थानकाचा चेहरा सध्या नूतनीकरणामुळे बदलत असताना, आता हे स्थानक हरित स्थानक म्हणून विकसित व्हावे, अशी ठोस मागणी इचलकरंजी नागरिक मंचने आगार व्यवस्थापक शिल्पा थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
नागरिक मंचच्या शिष्टमंडळाने बसस्थानक परिसराची पाहणी करून पर्यावरणपूरक उपाययोजनांची सूची तयार केली आहे. सौरऊर्जेचा वापर, वृक्षारोपण व स्थानक सौंदर्याकरण यावरही भर देत मंचने छतावर सौर पॅनल्स बसवण्याची, भिंतीलगत फुलझाडे लावण्याची सूचना केली आहे. पावसाळ्यात रोपांची जबाबदारीही मंचने स्वीकारली आहे. प्रवाशांच्या सुविधांसाठी कोल्हापूर विनावाहक गाडी सुरू करण्यासह विविध मागण्या केल्या आहेत. यावेळी उमेश पाटील, राजू कोन्नूर, अमितकुमार बियाणी, कल्पना माळी, डॉ. सुप्रिया माने, सुषमा साळुंखे, दीपक पंडित, अशोक शर्मा यांच्यासह नागरिक मंचचे सदस्य उपस्थित होते.

