हॉटेल कामगाराच्या मुलीने केले खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण

संग्रहित छायाचित्र

वरेवाडी-कुंभारवाडी या. शाहुवाडी येथील सामान्य हॉटेल कामगार बंडू भोसले यांची कन्या कु.अंकिता भोसले हिने खडतर परिस्थितीचे नकारार्थी भांडवल न करता मुंबई पोलीस दलाच्या परीक्षेत दिमाखात यश मिळवले. साहजिकच पोलीस भरतीत यश मिळवलेल्या कु.अंकिताचे खाकी वर्दीचे स्वप्न अखेर साकार झाले आहे.

दरम्यान, गरिबा घरची लेक अंकिता ही पोलीस झाल्याचे समजताच वरेवाडी-कुंभारवाडी गावातील आबालवृद्धांमध्ये आनंदाला अक्षरशः उधान आले होते. गावकऱ्यांनी झान्झपथक, हलगी, लेझीम, घुमके या पारंपरिक वाद्यांच्या गजरात अंकिता हिची जंगी मिरवणूक काढली.

वरेवाडी हे मसाई पठाराच्या पायथ्याशी असणारे छोटेखानी गांव. लहरी पावसावर विसंबलेल्या तुटपुंज्या शेतीतून निघणाऱ्या बेभरवशी उत्पन्नावर कशीबशी गुजराण करणारे गावकरी. साहजिकच संघर्षमय वाटेवर जीवनाचा निभाव लागावा म्हणून आजही अनेकांना कामधंद्याच्या शोधात शहराचा रस्ता धरावा लागतो. त्यातीलच बंडू भोसले यांचं एक कुटुंब. घरची परिस्थिती बिकट. म्हणून त्यांनी कोल्हापूर येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम पत्करले.

दरम्यान, मुलगी अंकिता हिने वडीलांच्या अथक आणि अफाट कष्टाचे चीज करण्याचा मनोमन चंग बांधला होता. बांबवडे येथील शाळेला जाता येता पायवाट तुडवत तिने शिक्षण घेतले. सरकारी नोकरीत जाणे आणि त्यातल्या त्यात खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून अंकिताने आपल्या स्वप्नाला आकार देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. प्रचंड जिद्द, अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत तीने नुकतेच मुंबई पोलीस दलाच्या भरती परीक्षेत यश मिळवले आहे. तिच्या या यशाचा संपूर्ण गावाला अभिमान आहे. लोकनियुक्त सरपंच आनंदा भोसले व ग्रामस्थांनी अंकिता हिच्यासह तिची आई सविता भोसले, वडील बंडू भोसले यांचा सत्कार केला. बाबासो भोसले, उपसरपंच बाबासो बोरगे, सदस्य कृष्णा भोसले, ग्रामसेवक लक्ष्मण तुरुके, प्रकाश खोत आदींसह गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
अंकिता हिच्या या यशाचे कौतुक व्हावे, या बरोबरच तरुण पिढीमध्ये प्रेरणा जागृत व्हावी या उदात्त हेतूने तिची गावातून वाजतगाजत जंगी मिरवणुकही काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत झळकलेले ‘लेक वाचवा’, ‘मुलगी शिकली प्रगती झाली’, ‘झाडे लावा.. झाडे जगवा’, ‘स्वच्छता हीच ईश्वर सेवा’, ‘पाणी अडवा…,पाणी जिरवा’, ‘पारंपरिक, सांस्कृतिक लोककलेचा वारसा जपलाच पाहिजे’ असे लक्षवेधी फलक सुसंस्कृत गावाच्या जडणघडणीचे साक्षीदार ठरले.

Scroll to Top