हेरवाडची निशिगंधा राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत अव्वल

कुरुंदवाड / प्रतिनिधी

मणिपूर येथे सुरू असलेल्या नॅशनल स्कूल गेम्स चॅम्पियनशिप २०२४-२५ अंतर्गत वेटलिफ्टिंग स्पर्धेत (१७ वर्षांखालील मुलींच्या गटात) हेरवाड (ता. शिरोळ) येथील कु. निशिगंधा सुरेश कडोले हिने देशात अव्वल क्रमांक पटकावून महाराष्ट्राचा झेंडा उंचावला आहे.
येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूलची विद्यार्थिनी असलेल्या निशिगंधाने आपल्या अफाट मेहनत, जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामागे तिला शाळेतील शिक्षकांसह हर्म्युलस जिमचे संस्थापक व प्रशिक्षक प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. निशिगंधा हिच्या या उल्लेखनीय यशामुळे हेरवाड, कुरुंदवाड परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून, तिने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.

Scroll to Top