मंगळवारी रात्री झालेल्या वादळी वार्यांसह पावसाने शहरात पायाभूत सुविधांची दैना उडाली. 50 हून अधिक झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी ड्रेनेज तुंबल्याने सांडपाणी रस्त्यांवरून वाहत होते. वादळी वार्यांमुळे काही वाहनांसह विद्युत यंत्रणेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, रात्री अनेक भागांत सहा तास विद्युतपुरवठा खंडित झाला.
मंगळवारी रात्री झालेल्या पावसात न्यू पॅलेस परिसरातील मराठी शाळेच्या इमारतीवरच झाड उन्मळून पडल्याने शाळेचे 10 ते 15 लाखांचे नुकसान, तर शाळेजवळ पार्क करण्यात आलेली दोन चारचाकी वाहने झाडाखाली सापडल्याने त्यांचेही आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचे अग्निशमन दलातून सांगण्यात आले.
शहरात विविध ठिकाणी 30 ते 35, तर बांधकाम भवन परिसरात सुमारे 15 झाडे उन्मळून पडली. पितळी गणपती ते पोस्ट कार्यालय, पोवार मळा, डायमंड हॉस्पिटल, सासने मैदान, घोरपडे गल्ली, जिल्हा परिषद परिसर, पोलिस मुख्यालय, कोल्हापूर आकाशवाणी केंद्र, लाईन बाजार मटण मार्केट, मुख्य पोस्ट ऑफिस रमण मळा आदीसह ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. परीख पुलाजवळ ड्रेनज तुंबल्याने पुलाखाली पाणी साचले. महापालिकेने सकाळी ड्रेनेज चेंबर दुरुस्त करून पाण्याचा निचरा केला. याबरोबरच शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी आदी भागांत गाटारींतील पाणी, कचरा थेट रस्त्यावर पसरल्याने रस्त्यांवर घाण आणि कचर्याचे साम—ाज्य होते. महापालिका आरोग्य विभागातर्फे स्वच्छता मोहीम राबवून कचरा उचलण्यात आला. मुख्य पोस्ट कार्यालयासमोर सिमेंटच्या खांबांवर बसविलेला ट्रान्स्फॉर्मर जमीनदोस्त झाला.
बांधकाम भवन परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. मंगळवारी झालेल्या पावसाने या परिसरातील सुमारे 15 झाडे उन्मळून पडली. पन्हाळा उपविभाग कार्यालयासमोर मोठे झाड मुळासह उखडून पडल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला; तर मुख्य इमारतीसमोरही मोठ्या झाडासह इतरही झाडे पडल्याने परिसरात सर्वत्र झाडांच्या फांद्याच दिसत होत्या.
पावसाने महावितरणचे विद्युतखांब, ट्रान्स्फॉर्मर, वीजवाहिन्यांना फटका बसला. शहरात 11 के.व्ही.चे 90 खांब कोसळले. विद्युत यंत्रणेचे एकूण 50 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

