सूर्य आग ओकू लागल्याने गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात उन्हाचा जबर तडाखा जाणवत आहे. सलग दोन दिवसांपासून कमाल तापमान 39.6 अंशांवर स्थिरावले आहे. तापमानाच्या पार्याने उसळी घेतल्याने दुपारी उन्हाची तीव्रता इतकी असते की, रस्त्यावरून फिरताना अक्षरशः चटके जाणवत आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा असह्य उकाडा कायम राहत आहे. मंगळवारी सरासरी कमाल तापमानात 3 अंशांची वाढ होऊन पारा 39.6 अंशांवर स्थिरावला होता. यामुळे जिल्ह्याचे कमाल तापमान 40 अंश सेल्सअस इतके ग्राह्य धरण्यात आले.
सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणत होता. दुपारी दीडच्या सुमारास तापमानाने उच्चांक गाठला होता. दीड ते साडेतीनच्या सुमारास उन्हाची तीव्रता इतकी होती की, झळा जाणवत होत्या, यामुळे दुचाकीवरून फिरणे अवघड होत होते. उन्हापासून बचावासाठी नागरिक सावली शोधत होते. अनेकजणांनी उद्यानांमधील झाडांचा आधार घेतला होता, तर काहीजण छत्री, टोपी, स्कार्फ, स्टोलचा आधार घेत होते. उकाड्यापासून थंडावा मिळावा यासाठी शीतपेय, ज्यूस, ताक, लस्सी, सरबत पिण्यासाठीही स्टॉल्सवर गर्दी पाहायला मिळत होती. कोल्हापूरला बुधवारी हवामान विभागाने ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाच्या पावासाचा इशारा दिला आहे.
शहरात सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचा तडाखा जाणवत होता. 11 वाजण्याच्या सुमारास कमाल तापमान 35 अंशांपर्यंत वाढले होते. त्यानंतर उन्हाचा तडाखा वाढतच गेला, दुपारी साडेतीनपर्यंत पारा 39 अंशांच्या पुढे होता. सायंकाळी पाचनंतर उन्हाची तीव्रता कमी होत गेली. मात्र, किमान तापमान 23.2 अंश इतके होते. त्यामुळे सायंकाळनंतरही उकाडा कायम होता.

