अगदी काही दिवसांवर असलेलेया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुजित मिणचेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिणचे येथे पार पडली.
या बैठकीमध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी आपली मते भाषणाच्या माध्यमातून व्यक्त केली. यावेळी बहुतांश शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या मताने सुजित मिणचेकर यांनी येणारी विधानसभा निवडणूक लढवून ती जिंकावी त्यासाठी त्यांनी हवी ती भूमिका घ्यावी आम्ही सोबत आहोत अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी बैठकीदरम्यान बोलताना, हातकणंगले विधानसभेची जागा ही शिवसेनेचीच आहे आणि शिवसेनेलाच मिळावी ही भूमिका असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील हातकणंगले विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये आग्रही असून ते आपल्या सर्वांना नक्कीच न्याय देतील अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिली.