विशेष प्रतिनिधी
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेना पक्षाच्या फुटीमध्ये बहुतांश विद्यमान आमदार तसेच माजी आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यावेळी अनेक पदाधिकारी, खासदार, आमदार यांनी शिंदे यांना साथ देऊन शिवसेना पक्ष ठाकरें कडून काढून घेतला.
कोल्हापूर जिल्ह्यात देखील अनेक आमदार हे शिंदे यांच्यासोबत गेले. पण त्या संघर्षाच्या काळात मात्र माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, व माजी आमदार डॉ .सुजित मिणचेकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला व त्यांना पाठबळ दिले.
लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी पक्षाप्रती एकनिष्ठपणे काम करून भरघोस मते मिळवून दिली. पण आता विधानसभेच्या उमेदवारासाठी मात्र माजी आमदार डॉ. मिणचेकर यांना संघर्ष करावा लागत आहे. याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांच्यातून खंत व्यक्त केली जात आहे.
मागिल विधानसभा निवडणुकीमध्ये मिणचेकर यांचा निसटता पराभव झाला होता. तरी देखील खचून न जाता डॉक्टर मिणचेकर यांनी मतदार संघातील आपला संपर्क कायम ठेवला होता. हातकणंगलेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सक्रिय ठेवून पक्षाप्रती आपलं काम प्रामाणिकपणे केलं असून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिवसैनिक आग्रही असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे अडचणीच्या काळात साथ दिलेल्या दिलेल्या डॉक्टर मिनचेकरांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे न्याय देतील का असा प्रश्न मतदारसंघातील जनता विचारत आहे?