वादळी पावसामुळे स्मशानभूमीचे पत्रे उडाले

इचलकरंजी / प्रतिनिधी

चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे येथील पंचगंगा नदी घाटावरील स्मशानभूमीचे पत्रे उडून पडले आहेत. आता पावसाळा सुरु होणार असून त्वरीत हे पत्रे न बसवल्यास अंत्यसंस्कार करण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे स्मशानभूमीचे पत्रे त्वरीत बसवण्याची मागणी जवाहर छाबडा यांनी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, येथील पंचगंगा नदीकाठावरील स्मशानभूमीमध्ये चाणक्य सेवाभावी संस्थेच्यावतीने गेली २२ वर्षे अंत्यसंस्काराचे कार्य अविरत सुरू आहे. या स्मशानभूमीतील पत्रे वर्षापूर्वी बदलले आहेत. पण फिटींग व्यवस्थित न झाल्याने २७एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसामुळे स्मशानभूमीच्या शेडचे पत्रे उडून पडले आहेत. आता वळीव पाऊस आणि पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे शेडचे पत्रे त्वरीत बसवणे गरजेचे आहे. अन्यथा अंत्यसंस्कार करणे अवघड आणि त्रासाचे होणार आहे. त्यामुळे त्वरीत शेडचे पत्रे बसवण्याचे काम सुरु करावे.

Scroll to Top