आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यापीठला सुवर्णपदक

कोल्हापूर / प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठ सॉफ्टबॉल (महिला) संघाने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. विद्यापीठ महिला सॉफ्टबॉल खेळाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवत इतिहास घडविला आहे.
विक्रम सिम्हापुरी विद्यापीठ, नेल्लूर (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या अ. भा. आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (महिला) संघाने अंतिम सामन्यामध्ये लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पंजाबला हरवून अजिंक्यपद मिळवले. या संघाने सलग दहा सामने जिंकून विजेतेपद पटकावले.
संघामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सॉफ्टबॉल खेळाडू स्वप्नाली वायदंडे व ऐश्वर्या पुरी या नामवंत खेळाडूंसह करिश्मा कुडचे, अंजली पवार, मृणाली जाधव, साक्षी येताळे, वैष्णवी हुळहुळे, सृष्टी शिंदे, सलोनी नलवडे, सृष्टी कदम, श्रावणी चौगुले यांनी मोलाची साथ दिली. संघ प्रशिक्षक म्हणून प्रा. विनायक जाधव, संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. राम पवार यांनी काम पाहिले. संघास कुलगुरू प्रा डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू प्रा डॉ. पी. एस. पाटील व कुलसचिव डॉ. व्ही. एम. शिंदे, क्रीडा अधिविभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले.

Scroll to Top