गोकुळ’च्या तुपाला पुन्हा सिद्धिविनायक मंदिराची पसंती !

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ला यंदा २०२५-२६ या वर्षासाठी मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून एकूण २८० मेट्रिक टन गाय तुपाच्या पुरवठ्याची महत्त्वाची व प्रतिष्ठेची ऑर्डर पुन्हा मिळाली आहे. गोकुळ शिरगावमधील गोकुळ प्रकल्पस्थळी मुंबई कडे जाणाऱ्या पहिल्या १० मेट्रिक टन तुपाच्या वाहनाचे पूजन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते विश्वास पाटील, अरुण डोंगळे व संचालक मंडळ, अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले.
मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळने आपल्या स्थापनेपासून दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या गुणवत्तेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. गोकुळ गाय तुपाचा दर्जा, सात्विकता आणि नैसर्गिक सुवास यामुळेच सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने सलग दुसऱ्या वर्षी आम्हाला पसंती दिली आहे. हे फक्त गोकुळचे नव्हे, तर आमच्या लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळालेले प्रमाणपत्र आहे. सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून प्रतिवर्षी प्रसादासाठी हजारो लिटर शुद्ध तुपाची मागणी असते. सिद्धिविनायक मंदिरात नैवेद्य, महापूजा व धार्मिक विधींमध्ये वापरले जाणारे तूप पूर्णपणे गुणवत्तापूर्ण असावे या निकषावर गोकुळचे गाय तूप सलग दुसऱ्या वर्षी पसंद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी २०२४-२५ मध्ये २५० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा गोकुळने यशस्वीरीत्या केला होता. यावर्षीच्या टेंडरमध्ये ही गोकुळच्या गायीच्या तुपास प्रथम प्राधान्य मिळाले. या वर्षी मिळालेल्या नवीन २८० मेट्रिक टन ऑर्डरनुसार गोकुळकडून दरमहा सरासरी २४ मेट्रिक टन गायीचे शुद्ध तूप सिद्धिविनायक मंदिरास पाठविण्यात येणार आहे.
याप्रसंगी बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे,कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग महाव्यवस्थापक जगदीश पाटील, संगणक व्यवस्थापक अरविंद जोशी, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, प्रकाश आडनाईक, उपेंद्र चव्हाण, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.

Scroll to Top