इचलकरंजी / प्रतिनिधी
कलानगर परिसरातील एका वेस्टेज कापड आणि सुताच्या गोदामाला शनिवारी आग लागली. यामध्ये सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. शिवसागर केसरवाणी यांचे गोदाम आहे. शुक्रवारी सायंकाळी गोदाम बंद करून ते घरी गेले. शनिवारी स्थानिक नागरिकांनी डीगोदामातून धुराचे लोट निघत असल्याचे पाहून केसरवाणी यांना ही कळवले. तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. धुराच्या प्रचंड लोटामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना बचावकार्यात अडथळे येत होते. पत्र्याच्या शेडमध्ये गोदाम असल्यामुळे आत जाणे कठीण झाले. त्यामुळे जेसीबीच्या मदतीने गोदामातील कापड व सुताचा साठा बाहेर काढण्यात आला. दोन तासांनी ही आग आटोक्यात आली.
आगीत वेस्टेज कापड, सूत, तसेच गोदामातील विद्युत वायरिंग पूर्णतः जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या ठिकाणीच वर्षभरापूर्वी ही आगीची घटना घडली होती. हे गोदाम नागरी वस्तीत असल्याने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

