कोल्हापूर:
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे, रिसर्च डायरेक्टर डॉ. संदीप वाटेगांवकर व संशोधक विद्यार्थिनी अपर्णा तोडकर यांनी विकसित केलेल्या ऊर्जा साठवणूक करणाऱ्या उपयुक्त कॅडमियम सल्फाइड नॅनोपदार्थ निर्मितीच्या नाविन्यपूर्ण व कार्यक्षम पद्धतीला जर्मन सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. त्यांनी महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर जर्मन पेटंट प्राप्त करून जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय वाई हे नाव जागतिक पातळीवर पोहोचवले आहे.
याआधी डॉ.झांबरे, डॉ.वाटेगावकर यांच्या संशोधनाला युके सरकारचे पेटंट प्राप्त झाले असून त्यांना अमेरिकेच्या स्कॉलर जीपीएस संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात जागतिक शात्रज्ञांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
डॉ. झांबरे म्हणाले, ‘सध्याच्या जागतिक परिस्थितीत कार्यक्षम आणि शाश्वत ऊर्जा साठवणूक उपायांची निर्मिती ही काळाची गरज बनली आहे. ही गरज लक्षात घेऊन आमच्या टीमने ऊर्जा साठवणुकीसाठी उपयुक्त नॅनोपदार्थ निर्मितीची एक नाविन्यपूर्ण पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीने तयार केलेले कॅडमियम सल्फाइड नॅनोपदार्थ आणि फिल्म्स सुपरकॅपॅसिटर आणि बॅटरीसारख्या विद्युत उपकरणांमध्ये खूप प्रभावी आणि कार्यक्षम आहेत.
डॉ. वाटेगांवकर यांनी वाढती लोकसंख्या आणि उर्जेवरचा ताण पाहता, हे संशोधन ऊर्जा क्षेत्रासाठी एक नवीन दिशादर्शक ठरू शकते आणि नॅनोतंत्रज्ञानाच्या मदतीने ऊर्जा साठवण्याच्या नव्या उपाययोजना विकसित होण्यासाठी हे संशोधन एक सकारात्मक पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
या संशोधनात सहभागी होणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. मिळालेले पेटंट हे आमच्या टीमच्या मेहनतीचे फळ असून, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रेरणादायक गोष्ट आहे असे मत संशोधक विद्यार्थिनी अपर्णा तोडकर यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, रसायनशास्त्राच्या टीमने विकसित केलेली संश्लेषण पद्धत सोपी, कमी खर्चिक असून ही पद्धत नवोदित संशोधकांसाठी आणि कमी उपकरण असलेल्या प्रयोगशाळांसाठी खूप उपयुक्त आहे. याचा उपयोग शैक्षणिक आणि औद्योगिक संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.मदनदादा भोसले, उपाध्यक्ष श्री शंकरराव गाढवे, सचिव डॉ.जयवंत चौधरी, खजिनदार श्री नारायणराव चौधरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
