जयसिंगपुरात बंद पाडले गॅस पाईपलाईनचे काम

जयसिंगपूर/ प्रतिनिधी
शहरातील रस्त्याची खोदाई करून चुकीच्या पद्धतीने गॅस पाईपलाईन टाकली जात असल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्ते सागर मादनाईक यांनी शुक्रवारी सायंकाळी खोदाईचे काम बंद पाडले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली असून याबाबतची तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदाई केली जात आहे. चुकीच्या पद्धतीने लाईनचे काम होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मादनाईक यांनी सातव्या गल्ली येथे पाहणी केली असता रस्त्याच्या बाजूला असलेला कोबा वाचविण्यासाठी डांबरी रस्ता उकरण्यात आल्याचे दिसून आले.
चुकीच्या पद्धतीने शहरात काम होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. शिवाय याकडे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले होते. सायंकाळी पालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी रामचंद्र कुंभार यांना बोलावून चुकीच्या पद्धतीने खोदाई केलेली दाखवण्यात आली. यावेळी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली असून योग्य पद्धतीने पाईपलाईनचे काम करण्याची मागणी केली असल्याचे मादनाईक यांनी सांगितले. शिवाय पालिकेकडून सोमवारी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Scroll to Top